‘युद्धांत आणि प्रेमात सर्व माफ असते.’
‘केंद्रात राष्ट्रभक्तीचे तर राज्यात राज्यद्रोह्यांचे सरकार’
श्री एकनाथ शिंदे यांचे बंड होते. गद्दारीने सत्ता लालसा अगर खोक्याचा प्रकार नव्हता. असा तात्वीक मुलामा देऊन झालेले सत्ता परिवर्तन सोशिक जनतेने पाहिले, अनुभवले. भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा ही कारल्याची भाजी त्यात शेंगदाण्याची कूट आणि थोडीशी साखर टाकलेली असल्याने मोठ्या चवीने (सत्तेची भूक लागलेलीच होती) खाल्ली. भक्कम बहुमत असल्याने त्यांना आता कोणत्याच आद्यापाद्याची मदतीची गरज आणि आवश्यकता नसताना कदाचित १६ आमदार अपात्र ठरल्यास अगर आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी की आडवी माहित नाही मात्र फूट पडून /पाडून अजित पवार गट शिंदे फडणवीस सरकार मध्ये अभिमानाने सामील होऊन ९ मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा पार पडला. भुजबळ, अजित पवार समर्थकांनी जागोजागी गुलाल उधळला, भाजप कार्यकर्ते अनुशासन प्रिय आणि एकचालकानुवर्तते आणि *'निळकंठेश्वरांचे'* आदर्शाने न्हावून निघालेले असल्याने तसेच शरद पवार भाकर फिरवायचे आतच अजित दादा चुलीत मुतून गेल्याने काकाला भाकर फिरवता आली नाही. आणि कायद्याला गुंडाळून सत्तेचा गोंधळ सुरू झाला. आणि आता अजित दादांचे *'मुत्र'* शिंदे फडणवीस शासनात येऊन *'तिर्थ'* झालेले असल्याने *'वोटजिवी नेता'* आणि *'नोटजिवी बुद्धीजिवी'* यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे मुद्द्यांचे आधारावर भाजप कार्यकर्त्यांना संयम राखण्याची आणि समजून घेण्याची व समजावून सांगण्याची जबाबदारी देण्यात येईल आणि समान नागरी कायदा लोकसंख्या नियंत्रण कायदा UCC/NRC राष्ट्राला वाचविण्यासाठीचा एकमेव साधन प्राप्तीसाठी सत्ते शिवाय पर्याय नसल्याने असे सर्व प्रकारचे जादुई प्रयोग, चमत्कारिक डावपेच करणे, स्वीकारणे गरजेचे राहिल व आहे. यासाठी सांगण्यात येईल की, महाराष्ट्रात भाजप कधीही ११५ आणि १०५ जागेच्या पुढे जिंकू शकला नाही युती बनवून सुद्धा शक्ती वाढू शकली नाही, बीड जिल्ह्यातून रजनीताई अशोकराव पाटील यांचे रूपाने पहिला भाजपचा खासदार, परभणी मधून मेघना बोर्डीकर पहिली भाजप खासदार, नांदेड मधून प्रताप पाटील चिखलीकर पहिला भाजपचा खासदार हे सर्वच्या सर्व काँग्रेस मधूनच आलेले होते. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सुद्धा माया, ममता, जयललिता यांचे टेकू वरच सत्तेवर होते. ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसवासी मुळे सत्ता आहे. हेमंत विश्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री काँग्रेस मधूनच आलेले असून कट्टर हिंदू आणि भाजप नेत्यापेक्षा त्यांची कामगिरी सरस आहे. निष्ठावानांनी भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला निष्ठेने शिखरावर का नेले नाही? म्हणून थोडा धीर धरा, चुप रहा, समर्थन करा आणि मोदी शहा यांच्या गणिताने व फडणवीस यांच्या नीतीने चला.
सलग ९ वर्षे भाजप केंद्रात सत्तेत आहे तर राज्यात सुद्धा सुमारे ६ वर्षे सत्तेत असतांना त्यांनी किती निष्ठावान सामान्य कार्यकर्त्यांना राजकीय दृष्ट्या मोठे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी संघटनात्मक पावले उचलली याचा प्रामाणिक हिशोब घेतला तर मोठे करणे तर सोडाच परंतु ते संपतील कसे आणि सत्तेच्या बाहेर राहतील कसे हेच सुत्र राहिलेले असून जोशी, अडवाणी, पंकजा मुंडे, खडसे ही केंद्र व राज्यातील मोठी उदाहरणे आहेत. सुब्रमण्यम स्वामी, नितीनजी गडकरी संदर्भाने भविष्य सुद्धा अंधातरीच आहे. हा छुपा डाव कोणी आणि कसा पहावा? जी एक संपूर्ण निष्ठावान ध्येयवादी सिद्धांतवादी पिढी होती त्या संपूर्ण पिढीचे ९ वर्षात ९० टक्के खच्चीकरण झालेले असून आता तर एक तप निघून गेल्याने काळ बदलला आणि उरलेले १० टक्के निष्ठावान सुद्धा आता हतबल झालेले असून विद्यमान राजकीय धोरणांमुळे ते सुद्धा आपोआपच संपलेले आहेत, म्हणून त्यांची चिंता तरी का करावी? असा मुक्तविचार सत्तेच्या *'फडणवीस नितीचा'* गाभा सांगतो.
फ्रान्स देशाचे उदाहरण बघा ज्याने शरणार्थींना सामावून घेऊन त्यांना रोटी, कपडा, मकान देऊन सांभाळले. आज त्याच शरणार्थी कुर्दीस जमातीने फ्रान्सला जाळण्याचा पाखंडीपणा केला आहे. फ्रान्सने फुटबॉलच्या खेळात मोरेक्कोला हरविले हे सुद्धा या नमकहरामांना आवडले नाही. यांची आगजनी सोच आणि विचार यांचे दमन करणे गरजेचे आहे. बांगला देश की गुलामी भारत से अच्छी है असे पाखंडी घुसपैठीयांची अतिरेकी विचारसरणी ठेचणे गरजेचे आहे. एकाच ठिकाणी १० झाडे बाभळीची आणि १० झाडे आंब्याची लावली तर खाद्य, पाणी, सिंचनाचे आणि दररोजच्या मेहनतीने सुद्धा आंब्याची झाडे जगणार नाही मात्र कोणतीही मशागत न करता खत पाणी न देता सुद्धा बाभळीची झाडे मजबूत वाढून उगवतात. म्हणून आता गांधी नीती कालबाह्य झालेली असून महात्मा विदुर आणि आचार्य चाणक्य नीतीचा वापर करा. जेहादींना मुळापासून नष्ट करण्यासाठी एक देश एक पंतप्रधान तसे एक देश एक कानून आवश्यक असून सिविल कायद्यात, शिक्षण, टॅक्स कायद्यात बदल करण्याकामी सत्ता हवी आहे. हिंदू हा सहनशील आहे त्याच्या पाठीत खंजीर खुपसला जातो. कोणाला पाकिस्तान पाहिजे, कोणाला खलीस्तान पाहिजे, सेक्युलर आणि धर्मनिरपेक्षतेचे धडे आणि उपदेश केवळ हिंदूंनाच दिले जातात. मी हिंदू आहे आणि मला हिंदुस्तान पाहिजे असे म्हणणाऱ्यांना शेवटी संविधान दाखविले जाते, सांगितले जाते. जेथे श्रीरामाला सुद्धा सुप्रीम कोर्टात उभे राहावे लागले, हिंदूंनाच मृत्यूच्या खाईत फेकले जाऊन हिंदूंच्याच मुलींना, बहिणींना छळले जाते. त्यांची इभ्रत लुटली जाते. त्यांच्या घरांना अग्नीच्या स्वाधीन केले जाते. त्यांना त्यांचे जमिनीवरून हाकलून देण्यात येते. आतंकीच्या मौतीच्या बदल्यात भारताचे तुकडे करण्याचा शपथा घेतल्या जातात. हिंदूंच्या देवी देवतांची खिल्ली उडविली जाते. जर आज महात्मा गांधी जिवंत असते तर त्यांनी *'फ्रांस'* चे दोन तुकडे केले असते आणि त्यांना *'फ्रेंचपिता'* म्हणून संबोधण्यात आले असते. आजचे कटूसत्य हेच आहे की, *'शरणार्थी'* शब्दाचा पूर्ण अर्थ *'तुम हमे शरण दो, हम तुम्हें अर्थी देंगे'* चाहे भारत हो या फ्रान्स. अशी शरणार्थींची राष्ट्रभक्ती लक्षात घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी. जनतेने शंका, कुशंका न बाळगता विश्वास ठेवावा.भारतात किती ठिकाणी फ्रांस आहेत? 'फ्रांस का *'बारूद'* भारत में मौजूद'? 'घुसपैठीया बमपर बैठा है हिंदुस्तान! NRC लाओ फ्रांस बननेसे बचाओ, ताकी भारतमे ना हो फ्रांस जैसे दंगे' अशी वास्तवतेची परीस्थीती सांगितली जाईल. तसेच अशा नेमका २५० वर्षांपूर्वी आणि आज बारभाईचे कारस्थान काय योगायोग आहे पहाच. बारभाई मंडळ प्रमुख होता *फडणवीस* (नानासाहेब फडणवीस) आणि सोबत होता *शिंदे* (महादजी शिंदे) तेव्हा *'तह'* झाला सुरतचा....... आणि आताही सुरतच असे म्हणतात काळ कितीही बदलो माणसे आणि त्यांच्या वागण्याचा पद्धती बदलत नाहीत. आज जशी राजकीय उलथापालथ महाराष्ट्रात सुरू आहे तशीच उलथापालथ सुमारे २५० वर्षापूर्वी (इ.स. १७७४ ते इ.स. १७७९) या काळात झाली होती. स्री हट्ट, पुत्रमोह कारण काहीही असो अन्याय आणि कपटाने सत्ता मिळताच मोठ्या प्रमाणात दडपशाही करून राजगादी मिळवण्याचा व टिकवण्याचा प्रकार नवीन नाही.
अजित पवार गटाचा सरकारला पाठिंबा आणि सहभागा पूर्वी शिंदे गटाचा पाठिंबा ही कृती जनतेला, मतदारांना ती कितीही तात्विक, सात्विक वाटत असली अगर दर्शविण्यात येत होती तरी जनमानस हे शिंदे, फडणवीस सरकारच्या संदर्भाने नाखुषच होते आणि भाजपचा कार्यकर्त्यांनी हे विष हलाहल करणारे वाटत असले तरी त्यांनी *'निळकंठेश्वराचे रूपाने'* ते पचविलेही होते. आणि तो त्या मन:स्थितीत असतांना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे, फडणवीस युती सरकारमध्ये शामिल होऊन दिलेला पाठिंबा मात्र हा अभद्र असा राक्षस आहे. असेच भाजप कार्यकर्त्यांना वाटू लागले असून जनतेमध्ये, मतदारांमध्ये मात्र प्रचंड चीड निर्माण झालेली दिसत आहे. अर्थात निवडणुका येई पावेतो जनमानसातील ही चीड हळूहळू कमी होऊन ढोलके, चोनके आणि लाचार कार्यकर्त्यांची फौज पुन्हा याच भ्रष्ट सत्ताधीश पुढार्यांच्या चपला डोक्यावर घेऊन नाचू लागली तर नवल आणि आश्चर्य वाटू नये. पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना अजित पवारांचेच खिशात जवळपास फुकट मध्ये गेलेला असतांना हजारो शेतकरी मूग गिळून चुप बसलेले नव्हे तर उलट अजित पवारांना भेटून फोटो काढून जिंदाबादच्या घोषणा देण्यात धन्य समजतात. जनतेच्या नाड्या ओळखण्यात जो पारंगत असतो तोच नेता होऊ शकतो. हे तर कसलेले आणि सत्ताधीश नेते आहेत. म्हणून या गटाची शक्ती कमी लेखता येणार नाही. शिंदे गटापेक्षा हा गट बलशाली आहे व राहील. अजित पवारांचे प्रवेशाने शिंदे गटाची हवा हळूहळू पूर्णपणे निस्तेज होऊन जाईल, मात्र कालांतराने भाजपची शक्ती क्षीण करण्यामध्ये सुद्धा हा प्रवेश भाजपला मोठी डोकेदुखी राहील व ठरेल हे नाकारून चालणार नाही. उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तरी गर्दीचे रूपांतर हे मतदानात किती खेचू शकतील हा मोठा प्रश्न असून, शरद पवार यांची सध्याची शारीरिक अवस्था वयोमानानुसार क्षीण झालेली असून जखमी सिंह असला तरी घरातले वासे फिरले की घराचा वैरी हा जास्त त्रासदायक ठरतो. शिवाय राज ठाकरे इंदिरा काँग्रेसच्या जवळ गेले तर पुन्हा तत्व, सिद्धांत आडवे येणारच. असा हा राजकीय आखाड्याचा जुगाडावर भाकित करणे डोके चक्रावणारे आणि बुद्धीभ्रष्ट करणारे मोठे कोडे होऊन बसलेले आहे. एकूणच सर्व अविश्वासू आणि विश्वासघातकी त्यातल्या त्यात लाज लज्जा सोडून दिलेल्या वृत्तीचे राजकारण करण्याचा आणि दादागिरीचा राजकारणाने या क्षेत्रात ताबा मिळवलेला असल्याने स्वार्थी भ्रष्टवृत्ती महाराष्ट्राला कोठे नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही.
दिल्लीच्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशाचा हृदयातून आणि महाराष्ट्राचा पोटातून जातो. आणि राजकारणात प्रेतांना जाळले जात नाही त्यांना गाडले जाते. कारण वेळ आल्यावर पुन्हा गाडलेले मुर्दे उकलण्यासाठी आवश्यक ठरतात. सर्व पत्ते एकाच वेळी फेकता येत नसतात. म्हणूनच सिनेमा अजून बाकी आहे. आणि नरेंद्र मोदी हे पहिल्या ४ वर्षात फक्त काम आणि कामच करतात. नंतर शेवटचे १ वर्ष मात्र फक्त राजनीतीचेच राजकारण करतात, हा त्यांचा स्वभाव पाहता महाराष्ट्रात जो गोंधळ घातला गेला आहे असाच गोंधळ बिहार, बंगाल, देशात सर्व राज्यात घालून सर्व पक्षांचा नेत्यांचा मुसक्या आवळण्याचा आणि नसा दाबण्याचा प्रयोग झाला तर तो राजकारणाचाच भाग म्हणून युद्धात सर्व क्षम्य असते जे स्वीकारावे आणि बघावे लागेल, याला पर्याय नाही. अशा परिस्थितीत आता दाऊद इब्राहिम सुद्धा भाजपमध्ये सामील झाला तर तो सुद्धा देशभक्त होण्याचा मार्ग पटवून देण्यात कसूर ठेवली जाणार नाही. महाराष्ट्रात तर पुलोद, महाविकासआघाडी, शिंदे फडणवीस, नव्याने झालेली महायुतीचे राजकारण पाहता अशा सर्व राजकारणाची सुरुवात शरदराव पवार यांनीच केलेली असून शेवट सुद्धा शरदराव पवारांपासूनच होईल असे नीतीचे संकेत दिसतात.
गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर राज्य जळत आहे. तेथे जवळपास १३० हिंदू मारले गेले. २०० पेक्षा जास्त कोवळ्या मुलींशी दुष्कर्म केले गेले. ४१५ जखमी. सुमारे १५० जणांना अटक आणि हजारोंचे पुढे शरणार्थी ठरलेले असून, भारताचे पूर्व सैनिक रडतांना, तसेच खुलेआम तेथील कॅथालिक चर्च यांना म्यानमार आणि चीन मधून ईसाई देशातून मोठ्या प्रमाणावर हत्यारे व पैसा येतो. कित्येक जिल्ह्यातून हिंदू हद्दपार झालेला असून भारताच्या पंतप्रधानाबाबत मिसिंग पंतप्रधान असे पोस्टर लावले जात आहेत. राज्य भाजप अध्यक्ष सारजादेवी यांना काँग्रेस नेत्यांची तारीफ करण्याची भूमिका घेण्याचे प्रसंग घडत असून, तेथे हिंदू मरत आहे. मणिपूर मध्ये *'कर्मवाले'* हिंदू नष्ट होत असून केवळ *'नामधारी'* हिंदू सिताराम येचुरी नावाप्रमाणे दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय माहोल बिघडू नये म्हणून आणि *'जितना मुश्किल है तो नतमस्तक होते है!'* अशा भूमिकेत कॅथालिक चर्च समोर प्रधानमंत्र्यांनी शरणागती पत्करल्याचे व तेथे भाजपचा कार्यकर्ता बेहाल होत असल्याची स्थिती अजूनही देशासमोर आणण्यात आलेली नाही. मुसलमानांना सवलती द्या की त्यांचे पाय धुवून प्या तरी त्याचा उपयोग शून्य. म्हणूनच आता साम-दाम-दंड नीतीचा उपयोग करणे आवश्यक राहील. हिंदू जनमत आणि विचार संस्कृती ही क्षमापनाची, विस्मरणाची भोळीभाबडी, विश्वासू असल्याने आणि वादविवादात प्राविण्यता असलेली असल्याने ती ८० टक्के असूनही संघटित राहत नाही, हे गृहीत धरून मोदी शाह यांना रणनीती आखावी लागणार आहे. व्हेटो पॉवर वापरून राज्याराज्यांत पुरक राजनीति स्वीकारावी लागणार आहे. आणि *'अश्वथामा मेला'* 'नरो वा कुंजरोवा' अशी स्थिती निर्माण करून कृष्ण नीतीचे हे महाभारतातील युद्ध मोदी शाह खेळतील, म्हणून आता राजकारण काय चांगले आणि किती वाईट अगर घाणेरडे या विचारांना काहीच महत्त्व उरणार नाही. या युद्धात निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते मात्र केवळ भरडलेच नव्हे तर पार संपून जातील हे तेवढेच नक्की व खरे राहील. नाहीतरी आता निष्ठावानांचा काळ आणि निष्ठावान सुद्धा राहिलेले नाही. त्यांचे हाल शरपंजरी पडलेल्या भीष्म पितामहा सारखे झालेले आहेत. कोणताच राजकीय पक्ष सुध्दा राजकीय संघटनेच्या हातात राहिलेला नसून *'कायद्याने'* सुद्धा राजकीय संघटना संपविण्याचेच काम केल्याचे पुरावे म्हणजे शिवसेना पक्ष आणि नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रातील तमाशा आणि घातलेल्या धुडगुस वरून सांगता येईल. पक्ष कोणाचा आहे हे आता आमदार / खासदार यांच्या संख्येवरून ठरवले जात असल्याने, पक्ष तरी हवा कशाला? पक्षाध्याक्षापेक्षा आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांना जास्तीचे महत्व निर्माण झाल्यानेच आमदार, खासदार, मंत्री निवडीचे फटाके फोडले जातात मात्र संघटनात्मक पदाधिकाऱ्यांचे डोहाळे साजरे केले जात नाही. हे वास्तव आता जाणवू लागलेले आहे. कितीहीवेळा आणि कोणत्याही पक्षात, गटात गेल्याची चीड नसते. मात्र तो सत्तेच्या सरकारात मंत्री झाल्याचा आनंद हा गौरवाचा ठरतो. पुढारी तुरुंगात गेल्याचे जनतेला दुःख नसते मात्र पुढारी तुरुंगातून सुटल्यानंतरची भव्य मिरवणूकीत जनता मोठ्या संख्येने सामील असते, याचे वर्णन कोणत्या शब्दांनी करावे बरे? ईडी, सिडी हा अन्याय, अत्याचार वाटतो मात्र त्याला मंत्रिमंडळात घेताच त्याच व्यक्ती आणि पक्षाला जिंदाबादच्या घोषणेने ओवाळले जाते. चुक कोणाची? भ्रष्ट नेत्यांची की जनतेची? की लाचार कार्यकर्त्यांची? म्हणूनच तर काही महिन्यांपूर्वी (१ वर्षापूर्वी) शिंदे यांच्या रूपाने लग्न लावलेल्या बायकोला लेकरं होणार नाही, ती वांझ आहे असे अनुमान दिसू लागल्याने जर आता अजित पवार यांचे रूपाने नवी नवरी फडणवीस यांनी घरांत आणली, ती जरी फटकळ तोंडाची असली तरी तिला घाबरून व्यवस्थित संसार होऊन आणि ती सुद्धा चांगली रुळून अख्या घरादारावर कब्जा करून भविष्यात तिने जरी नवऱ्याला हाकलून दिले तरी तुर्तास तर ती वांज नसल्याने लेकरं बाळं देणार असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत तिचा भरपूर फायदा आणि लाभ असल्याने धुमधडाक्यात लग्न लावून आणण्यात आले. हाताची सगळी बोटं एकसारखे नसतात पण खाताना सगळी एक होतात. या न्यायाने नैतिकता आणि नीतिमत्तेचे राजकारण आता इतिहास जमा झालेले आहे. आमदार नवाब मलिक जर तुरुंगात नसते तर आज त्यांनी सुद्धा शपथ ग्रहण करून ते सुद्धा मंत्रिमंडळात सामील झालेले दिसले असते तरी काहीच आश्चर्य ठरले नसते. एकच दिसते की या नेत्यांना तुमच्या आमच्या दुःखाचं काहीच सोयर सुतक नाही केवळ निवडून आलेला आमदार करोडो रुपयांची कमाई करून आपल्या सात पिढ्यांचा उद्धार करून जातो, मंत्रिपदावर असलेला नेता एका तरुण मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्या करायला भाग पाडतो व पुन्हा मंत्री होतो. करुणा शर्मा पासून मुलांना जन्म देऊन द्विभार्याचा आदर्श समान नागरी कायद्याला बाधा न ठरता उलट सन्मानपूर्वक मंत्री पदावर विराजमान केला जातो. संपूर्ण राजकीय पक्ष चिन्हासह चोरी करणाऱ्या मंडळींचा सध्या भयभयाट सुरू आहे. कोणत्याही कारणांनी आणि परिस्थितीनुरूप एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री पदावरून हटविले जाऊन अजित पवारांचे रूपाने महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला तर आश्चर्य नव्हे तर हीच योजना, नियोजन राहील व आहे. नाही तरी आज आमचे मुख्यमंत्री हेमंत विश्वा शर्मा यांचे प्रमाणे अजित पवारांमध्ये धमक आणि कुवत राहील व आहे. शिवाय मराठा नेतृत्व, या सर्व गुणांचे आधारावर पाहिले जाईल. शरीर उघडे असले तरी तो मर्दाना आहे ना? त्याची नग्नावस्था पाहण्याची गरज उरणार नाही अशा पद्धतीने दुसऱ्याची कबर खोदताना भाजप स्वतःचीही कबर खोदत आहे. काहीही कारण असले तरी भाजप सेना युती तुटली / तोडली गेली ही भाजपची मोठी चुकच होती. मुख्यमंत्री पदाचा *'तू तू मैं मैं'* चा वादातून पाचही वर्षे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, भविष्यात अजित पवार राहतील तर भाजपला काय मिळाले? तर खुट्टा? निष्ठा, तत्त्व सिद्धांतांची गळचेपी करून मिळणार काय तर मंत्रिमंडळात १० ते १२ मंत्रीपदे. आणि झालेली चुक दुरुस्त करण्यासाठी व दुसऱ्याची जिरवण्यासाठी, स्वतःची जिरवून घेतांना द्वेष भावना ठेवून शिंदेचे रूपाने केवळ सत्ता परिवर्तनच नव्हे तर पक्ष चिन्ह हिरावून आमदार मंत्री पळवून झालेले सत्तेचे परिवर्तन ही दुसरी चुक, आणि आता या नामुष्कीला सावरण्यासाठी तुर्तास अजित पवार यांचे रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसफोडून भविष्यात काँग्रेसला तोडून सत्तेची सीमा वाढविण्याचा प्रयोग भविष्यात महाराष्ट्र भाजप संपण्यात होणार आहे.
राहुल गांधींना पप्पू, पप्पू म्हणून हिणवण्याची भाजपच्या सर्व सेल वरून केलेला असभ्यपणाचा प्रयत्न झाला. त्याच पप्पूंनी कर्नाटक जिंकले, भारत जोडो यात्रेत हजारो किलोमीटरचा पायी प्रवासातून *'मोहब्बतकी दुकान'* हा मंत्र देत जन माणसांना जोडले. नुकत्याच पाटणा येथील बैठकीत राहुल गांधी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून फोकस ठेवून सर्व विरोधकांनी एकत्रित येण्याची केलेली व्यूहरचना दिसू लागल्याने तसेच राहुल गांधींना झालेली २ वर्षाची शिक्षा आणि काढून घेतलेली खासदारकी व ताब्यात घेण्यात आलेला बांगला, देशभरातील ईडीचे छापे, प्रादेशिक पक्ष चिन्हासह सत्ता परिवर्तन आणि घातलेला गोंधळ सावरण्यासाठीच आता करीश्मा करावाच लागेल. जागतिक स्तरावरील भारतातील करीश्माई नेते फक्त स्वर्गीय इंदिरा गांधीच होत्या त्यानंतर मात्र त्यांचेहून सुद्धा जास्तीची क्षमता असलेले आणि सरस करीश्माई नेते आहेत *'नरेंद्रजी मोदी'* म्हणून आता १ वर्षे पूर्णपणे राजकारण आणि राजनीतीच खेळण्यात येऊन पुन्हा महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात की अशोकराव चव्हाण हे सुद्धा भाजपचे दोस्त झाले तर ४५ प्लसच काय ४८ जागा जिंकण्याची व्यूहरचना राहीली तर नवल वाटता कामा नये. महाराष्ट्रातून निघालेला हा रथ सुसाट वेगाने उत्तर प्रदेशातून मायावतीला धरलेले आहेच राजभर, अजितसिंग उंबरठ्यावर उभे आहेत. आता अखिलेश यादव यांच्या किल्याला सुद्धा सुरुंग लावून, बिहारमध्ये चिराग पासवान जितनराम माझी तर आहेतच परंतु नितीश कुमारचा तंबूला सुद्धा पेटवून ओरिसातील नवीन पटनायक आंध्र मधील चंद्राबाबू नायडू अगर चंद्रशेखर रेड्डी पंजाब मधून हरसिमरत कौर यांचे सह कर्नाटकातून तर विधानसभा काँग्रेसने जिंकून हिंदूवर अन्याय करीत पुन्हा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, बुरखा पद्धतीचे समर्थन आणि धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याने अशा दृश्यामुळे कर्नाटकात भाजपने सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागांवर विजय मिळवला तर तेही आश्चर्य वाटू नये. आणि हा विजयी *'अश्वमेघ* बंगालच्या खाडीला सुद्धा फोडून दक्षिणेकडील व सर्व ईशान्येकडील राज्यात हरहुन्नरी करीश्मा करून भाजपला पूर्वीपेक्षा जास्तीच्या स्वबळावर जागा आणि मित्र पक्षांसह एनडीएला ४०० च्या पुढे जागा मिळाल्या शिवाय मोदीशहा यांची रणनीती थांबणार नाही. यासाठीच वर्षभर मोदीशहा यांचे राजकारणाच्या नीती अनितीच्या या युद्धात भाष्य करणे योग्य राहणारे नसून ते पाहणे, त्याच्यात सामील होणे अगर तटस्थ राहणे एवढेच आपल्या हाती राहणारे आहे. युद्ध सुरू झालेले आहे म्हणून यापुढे आता तत्व, सिद्धांत, सभ्यता धर्म-अधर्म या संदर्भातील लेख लिहिण्याचे अगर विचार व्यक्त करून क्रिया प्रतिक्रिया टाळलेल्या बऱ्या यासाठीच हा खटाटोप.
बाहुबलीला पाठीमागून छुरा खुपसून मारणाऱ्या कटप्पांची संख्या केवळ उदाहरण देण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून, आता तर जिल्ह्या जिल्ह्यांत, राज्या राज्यांत, संपूर्ण देशात कटप्पांचे पीक उभरलेले असल्याने मोदी शहांना अशा कटप्पांना हाताशी धरण्यासाठी विशेष ताकद वापरण्याची गरज यासाठी सुद्धा नाही, कारण विरोधकांमध्ये बाहुबलीच नाही हे वास्तव चित्र आहे. आणि कटप्पांनाच मोदी शहाच्या मदतीची आशीर्वादाची गरज निर्माण झालेली आहे एवढे भयानक राजकारणाच्या युद्धातले संदर्भ बदलले गेलेले असल्याने आता मेंदूला ताण देण्यात बुद्धीही शिल्लक राहिलेली नाही असे हे राजकीय युद्ध पहावयास मिळणार आहे.
लालूप्रसाद यांनी नितीशकुमार यांना चुकीने *'पल्टूरामची'* उपाधी दिली. खरे पाहता शरदराव पवार हेच खरे *'पल्टूराम'* असून पुलोदची निर्मिती हे पहिले उदाहरण आणि प्रयोग असून पहिले *'कटप्पा'* म्हणून शरद पवार यांनाच संबोधावे लागेल आता तर चंद्रकांत दादा पाटील इतिहासातील पान ठरतील. अल्पावधीतच मी हाय नव्हं पक्षात, नाहीतर दुसरा दादा (अजितदादा) आला म्हणून मला काढशील. असे प्रत्यक्ष घडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. शरद पवार यांचे संदर्भाने काहींच्या लिखाणातून आले की हा नियतीने उगवलेला सूड आहे. परंतु यालाच रामायणाच्या भाषेत सांगायचे तर श्रीरामांनी दिलेल्या वराचा हा प्रत्यक्ष साक्षात्कार आणि युगातील प्रवास आहे. कारण राम वनवासात जातांना त्यांना निरोप देण्यासाठी आलेल्या सर्व जनतेला माघारी जाण्यासाठी राम म्हणाले होते की सर्व *'नर आणि नारी'* यांनी आपापल्या घरी जा. सर्व नर आणि नारी निघून गेले मात्र *'तृतीयपंथी'* तेथेच थांबलेले पाहून श्रीरामांनी तुम्ही येथे कां थांबलात अशी विचारणा करता ते म्हणाले प्रभू! तुम्ही *'नर आणि नारींना'* तसे आदेश दिले आम्हाला नाही. तेव्हा श्रीरामांनी त्यांनाही वर दिला की जा! एक वेळ तुमचेही राज्य येईल आज अशा पद्धतीचे *'नपुसकांचे राज्य'* म्हटले तर राग येईल. मात्र अशा पद्धतीचे सम्यक राज्याचा अनुभव मात्र दिसू लागलेला आहे. शिंदे, पवार, फडणवीस सरकार अशी *'मिक्स भाजी'* राज्यातील सर्व जनतेला, मतदारांना कार्यकर्त्यांना खुप आवडेल. चंद्रकांतजी रघुवंशी उर्फ चंदूभैयांना तर *'स्वादिष्ट आणि रुचकर'* लागेल. थोड्याच दिवसात बाळासाहेब थोरात अगर अशोक चव्हाण आले तर सर्वोत्तमच. *'सभीके सभी मेरेच है और मैं सबका हूॅं!'* कार्यकर्त्यांची सुद्धा आता केवळ गट बदलण्याचीच नव्हे तर पक्ष बदलण्याची सुद्धा सोय झालेली आहे. भुजबळांचे भाषेत सांगितले तर त्यांचे गुरु शरद पवार आहेत मग बाळासाहेब ठाकरे कोण होते? गुरु बदला, बाप बदला, पक्ष बदला, गट बदला नाही तरी कर्नाटक राज्यात महिलांना एस.टी. प्रवास मोफत असल्याने बुरखा घालून काही माणसे मोफत प्रवास करायला लागलीच की? असे कृत्रिम लिंग बदलायचे प्रयोग सर्वत्र मज्जाच मज्जा. गल्लीत कोणाचाही ढोल, वाजंत्रीचा आवाज कानावर आला तर तो आपल्याच लग्नातील अगर विजयाचा आहे असे समजून बिनधास्तपणे नाचायला आणि गुलाल उधळायला, भंडारा खायला सुद्धा मनाई नसून, किरीट सौमय्या, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, अजित पवार सर्व एकत्र. आता कसं वाटतं गार, गार वाटतं.असा हा सुंदर *'डी मार्ट'* एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध. जगाच्या नकाशात किती सुंदर दिसतो नाही? अशा पद्धतीचा *'सबका साथ सबका विकास'* आणि *'स्वातंत्र्याची वाट'* देवेंद्रजी फडणवीस यांनी मोकळी करून दिल्याने उभा महाराष्ट्र त्यांचा ऋणी राहील. धन्यता मानून फडणवीसनितीचा इतिहास गौरवाने लिहिण्यासाठी काहींना खुप आनंद आणि गर्व वाटेल. फडणवीस यांना बघून कार्यकर्ते आता म्हणू लागले की, *'समज रहे थे जिसे हम संभालने वाला लेकिन वही निकला सबको मुसिबत मे डालनेवाला' 'माना कि अब वफा का जमाना तो है नही फिर भी ये राह छोडके जाना तो है नही'* अशा पद्धतीने केवळ कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य मतदाराला वेड लागण्याची पाळी आली आहे.
लक्ष्मण हिरालाल कदम शहादा
मो.नं. ९४२२७८७५०
