पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील साखर कारखान्यातील दूषित मळी वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलेली पाटचारी बेकायदेशीरपणे बुजविल्याचा प्रकार समोर आला आहे.

(प्रतिनिधी) : पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील साखर कारखान्यातील दूषित मळी वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलेली पाटचारी बेकायदेशीरपणे बुजविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित विकासकावर कठोर कारवाई करावी व टाकलेला भराव तात्काळ हटवावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी, शहादा यांना शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या नेतृत्वाखाली तक्रार अर्ज सादर करण्यात आला. अर्जात नमूद केल्याप्रमाणे, कारखान्यातील दूषित मळीची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी कारखाना परिसरापासून मोहिदा शिवारापर्यंत पाटचारी तयार करण्यात आली होती.मात्र, काही दिवसांपूर्वी मोहिदा शिवारातील सर्वे नंबर ५९२ जवळील एका विकासकाने कोणतीही परवानगी न घेता सुमारे १५० ते २०० मीटर लांबीचा मातीचा भराव टाकून ही पाटचारी बुजविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मळीचा प्रवाह थांबून परिसरात ती साचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.याचा परिणाम पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, आदिनाथनगर, महावीर नगर, पार्श्वनाथ नगर, मानस विहार, छोरीया टाऊन तसेच शिक्षक कॉलनी परिसरावर होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. दूषित मळीमुळे भूगर्भातील पाणी दूषित होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या शेतीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी व पाटचारी पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वेळेत कार्यवाही न झाल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.ही तक्रार प्रांत कार्यालयात प्रभारी नायब तहसीलदार जगदीश चखणे यांनी स्वीकारली असून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार, नगरपरिषद तसेच संबंधित साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत.