शिंदखेडा तालुका -प्रतिनिधी -प्रविण
भोई शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी सुधीर ईशी यांचे आवाहन : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी वेळेत सहभागी व्हावे..शिंदखेडा, दि. २० जुलै – खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी श्री. सुधीर ईशी यांनी केले आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी धुळे जिल्ह्यात भात, ज्वारी (चारी), बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कापूस तसेच खरीप कांदा या अधिसूचित पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. या पिकांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, वादळ तसेच इतर नैसर्गिक संकटांमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे.धुळे जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांची पीक विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै २०२६ पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी, असेही श्री. ईशी यांनी सांगितले.या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. अधिसूचित सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तर (Risk Level) निश्चित करण्यात आला असून, पीक नुकसानीच्या परिस्थितीत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.तालुका कृषी अधिकारी श्री. सुधीर ईशी यांनी सांगितले की, पीक विमा अर्ज करताना शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, ७/१२ उतारा, पीक लागवड स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक, भरलेला विमा प्रस्ताव अर्ज, आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील तसेच भाडेतत्त्वावरील शेती असल्यास नोंदणीकृत भाडेकरार असणे आवश्यक आहे. तसेच पीक नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण (Digital Crop Survey) अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शेतकरी राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, प्राथमिक कृषी पतसंस्था, ग्रामीण बँका, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) यांच्यामार्फत तसेच pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अचूकपणे सादर करावीत, जेणेकरून विमा मंजुरी प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण देणारी महत्त्वपूर्ण योजना असून, तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे विमा संरक्षण निश्चित करावे, असे आवाहन श्री. सुधीर ईशी यांनी केले आहे.यावेळी शिंदखेडा तालुका पीक विमा प्रतिनिधी सचिन बोरसे उपस्थित होते. तसेच योजनेबाबत अधिक माहिती अथवा अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
