मालेगाव प्रकरणात ऐतिहासिक निकाल!अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणी दोषीला फाशीची शिक्षा; पीडित कुटुंबाला १० लाखांची मदत
मालेगाव : महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवरील अमानुष लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत कठोर निकाल सुनावला आहे. या प्रकरणातील दोषी आरोपी विजय ऊर्फ शेखर खैरनार (वय २४) याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच पीडित कुटुंबीयांना शासनाकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिल्याची माहिती आहे.अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणात आरोपीविरुद्ध अपहरण, पोक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार, पुरावे नष्ट करणे आणि निर्घृण खून यांसारख्या गंभीर आरोपांखाली खटला चालविण्यात आला.न्यायालयात झालेल्या सखोल सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पीडित कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, समाजातूनही या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.पीडित कुटुंबाला १० लाखांची आर्थिक मदतया प्रकरणातील पीडित कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाची दखल घेत न्यायालयाने शासनाकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत. या मदतीमुळे कुटुंबाला काही प्रमाणात आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.बालकांवरील अत्याचाराविरुद्ध कठोर संदेशअवघ्या साडेचार वर्षांच्या निष्पाप बालिकेवरील अत्याचार आणि हत्या ही मानवतेला काळिमा फासणारी घटना होती. या प्रकरणातील निकालामुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, जनजागृती आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
