सोनवल ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन; शाळेजवळील मुतारी व सार्वजनिक शौचालयाची तातडीने दुरुस्ती, कचरा हटविण्याची मागणी

सोनवल ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन; शाळेजवळील मुतारी व सार्वजनिक शौचालयाची तातडीने दुरुस्ती, कचरा हटविण्याची मागणी

:विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; स्वच्छ भारत मिशन किंवा १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून त्वरित कारवाईची मागणी

शहादा | प्रतिनिधीशहादा तालुक्यातील सोनवल येथील ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळील सार्वजनिक मुतारीची झालेली दुरवस्था, परिसरात साचलेला घनकचरा तसेच मुख्य रस्त्यावरील सार्वजनिक शौचालय नादुरुस्त अवस्थेत असल्याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हा परिषद शाळेजवळील सार्वजनिक मुतारीची नियमित स्वच्छता व देखभाल होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, काही नागरिकांकडून त्याच परिसरात घनकचरा टाकला जात आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अस्वच्छ वातावरणामुळे विद्यार्थी व शिक्षकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.याशिवाय मुख्य रस्ता परिसरातील सार्वजनिक शौचालय गेल्या काही काळापासून नादुरुस्त असल्याने ते वापराबाहेर गेले आहे. परिणामी नागरिकांना, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.ग्रामस्थांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून किंवा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक मुतारी व सार्वजनिक शौचालयाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, शाळेजवळील साचलेला कचरा त्वरित हटवून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे तसेच कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी सूचना फलक लावून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.हे निवेदन सामाजिक कार्यकर्ते गोपाल संजय कोळी यांनी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीकडे सादर केले असून, यावेळी राकेश पाटील, भटू कोळी, गोकुळ कोळी, उगलाल भिल, मोहनचंद भिल, वैभव बच्छाव, भावेश पाटील, तुळशीराम पाटील, बापू पानपाटील, पंकज बच्छाव, विनोद पानपाटील, सुनील भिल, राजेश मोरे, नाना पानपाटील, आनंद पानपाटील, कल्पेश पाटील, सागर भिल, दीपक भिल, विजय भिल, संतोष भिल, विश्वास पाटील, गणेश भिल यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.गावातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा तसेच नागरिकांच्या मूलभूत स्वच्छता सुविधांचा प्रश्न लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.