महावितरण कर्मचाऱ्यांची अरेरावी बेतली वृद्धाच्या जीवावर; शहाद्याच्या पिंपरी गावात संताप, धक्काधुक्कीत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यूशहादा (प्रतिनिधी):तालुक्यातील पिंपरी येथे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कथित गैरवर्तनामुळे आणि झालेल्या धक्काधुक्कीमुळे नत्थू लिमजी पाटील या वयोवृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी गावात तीव्र संतापाची लाट उसळली असून, संतप्त गावकऱ्यांनी तपासणीसाठी आलेल्या महावितरणच्या ८ कर्मचाऱ्यांना जागीच कोंडीत पकडून घेराव घातला आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची आणि कायदेशीर कारवाई केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा, तसेच मृतदेह थेट महावितरण कार्यालयात नेण्याचा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.ओळखपत्राविना आणि अधिकृत आदेशाशिवाय तपासणीमिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजता महावितरणचे कर्मचारी अजित बालमसिंग नाईक, विजय महाने, योगेश जाधव, राकेश जाधव, पंकज कुंभार, तुषार पाटील, नारसिंग पावरा आणि दिलीप गावित हे गावात वीज जोडणी व मीटर तपासणीसाठी दाखल झाले होते. मात्र, या कर्मचाऱ्यांकडे तपासणीचा कोणताही अधिकृत लेखी आदेश नव्हता, तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याकडे स्वतःचे ओळखपत्रही (आयकार्ड) नव्हते. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांनी गावात अरेरावी सुरू केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.कर्मचाऱ्यांच्या धक्काधुक्कीत वयोवृद्धाचा मृत्यूयाच तपासणी दरम्यान गावात महावितरणचे कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान झालेल्या धक्काधुक्कीत वयोवृद्ध नत्थू लिमजी पाटील यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या याच हुकूमशाही, बेजबाबदार आणि हिंसक वृत्तीमुळे एका निष्पाप वृद्धाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत गावकऱ्यांचा संयम सुटला.गावात तणाव; गावकऱ्यांचा आक्रमक पवित्राघटनेची माहिती मिळताच संपूर्ण गाव घटनास्थळी जमा झाले. संतप्त ग्रामस्थांनी संबंधित सर्व ८ कर्मचाऱ्यांना जाब विचारत जागेवरच रोखून धरले आणि त्यांना घेराव घातला.गावकऱ्यांची मुख्य मागणी:”संबंधित सर्व दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. गरज पडल्यास मृतदेह थेट महावितरणच्या कार्यालयात नेऊन आंदोलन करू!”प्रशासन घटनास्थळी रवानाघटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस दल आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी पिंपरी गावाकडे रवाना झाले आहेत. गावात सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. महावितरणच्या या मनमानी आणि जीवघेण्या कारभारावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांची अरेरावी बेतली वृद्धाच्या जीवावर; शहाद्याच्या पिंपरी गावात संताप, धक्काधुक्कीत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू
