*मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकाऱ्यांची प्रकाशा कन्या शाळेला अभ्यास दौऱ्याच्या अनुषंगाने भेट
*झुंजार क्रांती न्युज प्रतिनिधी विनोद शिंदे प्रकाशा= शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा व विविध शासकीय उपक्रमांचा घेतला सविस्तर आढावा; विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले समाधान नंदुरबार दि.३०विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन निष्पत्ती आणि शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा,व शामनगर प्रकाशा येथे अभ्यास दौऱ्याच्या अनुषंगाने भेट देऊन शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरापासून ते शाळेतील पायाभूत सुविधांपर्यंत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.मा. अवर सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई यांच्या दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांचा नंदुरबार जिल्ह्यात अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने श्री. अजित बाविस्कर (उप सचिव), श्री. विपिन कळसकर (कक्ष अधिकारी), श्री. सौरभ नेवाळकर (सल्लागार) आणि श्री. ओमकार देशमुख (समन्वयक) यांनी प्रकाशा येथील जिल्हा परिषद कन्या शाळा व शामनगर शाळेला भेट दिली.शैक्षणिक गुणवत्तेचा सखोल आढावाभेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. भाषा, गणित, इंग्रजी पेटीचा वापर, निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसह विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, अध्ययन क्षमता आणि शैक्षणिक प्रगती यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे, त्यांचा आत्मविश्वास आणि शैक्षणिक आकलन यांची पाहणी करून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.शाळेतील अप्रगत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, विद्यार्थ्यांना दिले जाणारे मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, विद्यार्थी वाचनालय, ई-लर्निंग व डिजिटल शैक्षणिक साहित्य यांच्या वापराबाबतही सविस्तर माहिती घेण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचा यावेळी आढावा घेण्यात आला.स्वच्छता, पायाभूत सुविधा व पोषण आहाराची पाहणीशाळेतील भौतिक सुविधांची पाहणी करताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची स्थिती, शालेय परिसरातील स्वच्छता, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची व्यवस्था आणि मुलींना देण्यात येणाऱ्या गणवेशासंदर्भातील बाबींची तपासणी करण्यात आली. तसेच स्वच्छता सेवा सप्ताह अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली.शाळेतील स्वच्छ, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण, शैक्षणिक साधनांचा उपयोग आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी या बाबींवर अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अधिकाऱ्यांकडून शुभेच्छाविद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या उत्तरांबाबत आणि शैक्षणिक गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी नियमित अध्ययन करावे, वाचन-लेखन कौशल्ये विकसित करावीत आणि शैक्षणिक प्रगतीच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, अशा शुभेच्छा अधिकाऱ्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे महत्त्वही या भेटीत अधोरेखित झाले.वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशया प्रसंगी शाळेच्या परिसरात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धन, निसर्गप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शाळेच्या वतीने मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.मान्यवरांची उपस्थितीया अभ्यास दौऱ्याप्रसंगी जिल्हा परिषद, नंदुरबारचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. भानुदास रोकडे, पंचायत समिती, शहादाचे गटशिक्षणाधिकारी श्री. डी. डी. राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सुनील तावडे ,शिक्षण विस्तार अधिकारी अक्कलकुवा, श्री शेखर धनगर आणि प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. मनोज पिंजारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विनोद शिंदे उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र पाटील, शिक्षक श्री. गोपाल गावित, शिक्षिका श्रीमती प्रियंका पाटील आणि श्रीमती नूतन पाटील यांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेची वाटचाल महत्त्वपूर्णशाळेला दिलेल्या या भेटीमुळे शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन निष्पत्ती, डिजिटल शिक्षण, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाश पडला. शासकीय शाळांमधील शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद यांमुळे शाळांच्या कामकाजाचे वास्तव चित्र समोर येण्यास मदत होते. विद्यार्थिकेंद्रित अध्यापन, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि शिक्षकांचे समर्पित प्रयत्न यांच्या बळावर ग्रामीण भागातील मुलींना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने जिल्हा परिषद कन्या शाळा, प्रकाशा यांची वाटचाल सुरू आहे.
