**झुंजार क्रांती न्युज प्रतिनिधी विजय परदेशी*
प्रकाशा=…*दि.30-10-25 रोजी प्रकाशा येथील वि. का. सोसायटीची मागणी अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यातील विशेषतः प्रकाशा सर्कलमधील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याने त्वरित शेती पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना शासना कडून भरपाई देण्यात यावी या उद्देशाने मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनाला प्रकाशा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी आपली मागणी शासन दरबारी केली. याबाबत गुरुवारी प्रकाशा सर्कलमधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात लेखी निवेदन दिले.नायब तहसीलदार श्री.राजपूत यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा, प्रकाशा पंचक्रोशीमध्ये चक्रीवादळ स्वरूप अवकाळी पावसाने दोन दिवसात सुमारे 110 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे.यात कापूस, सोयाबीन अजवान, मिरची, केळी,ऊस, तुर इत्यादी पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचा कापूस, मका काढणीला आलेला असून सततच्या अवकाळी पावसामुळे कापसाची सरकी फुटून कोंब वाढत आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे कापूस पीक संपूर्ण वाया गेला असून शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. मिरची, पपई पिकांवर पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊन जमिनीची धुळधान झालेली आहे. पपई, ऊस, केळी पिकांवर जमिनीत साचलेल्या पावसामुळे बुरशी आली आहे. परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी केली असून शेतात जास्त प्रमाणात पाणी साचल्यामुळे उगवणीस आलेले पीक जागीच सडून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही पिकांची दुबार पेरणी करावी लागणार आहे.त्यामुळे बळीराजा अवकाळी पावसाने संकटात सापडला असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी व शासनास सदर निवेदन देऊन लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे,अशी मागणी निवेदनात करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, प्रांताधिकारी आदी शासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. निवेदन सादर करतांना प्रकाशा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप ज्ञानदेव पाटील, व्हाईस चेअरमन दशरथ पुरुषोत्तम पाटील, संचालक सुनील पुरुषोत्तम पाटील, बिपिन नरेंद्र पाटील यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
