के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ‘बी.एस्सी. ऑनर्स कृषी’ प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ‘बी.एस्सी. ऑनर्स कृषी’ प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; 25 जुलै अंतिम मुदत.शहादा,दि.17(प्रतिनिधी) येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ‘बी.एस्सी. ऑनर्स (कृषी)’ या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 जुलै पर्यंत असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. बारावी विज्ञान उत्तीर्ण झालेल्या आणि चालू वर्षात एमएचटी सीईटी, जेईई किंवा नीट या प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही चूक होऊ नये आणि नोंदणी प्रक्रिया अचूक व्हावी, यासाठी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन व ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी थेट महाविद्यालयात संपर्क साधून आपला अर्ज अचूक भरून घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांनी केले आहे.ऑनलाईन नोंदणीची ही पहिली फेरी संपल्यानंतर, गुणवत्ता यादी आणि पुढील प्रवेश फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET Cell) अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेळेत आपली नोंदणी करून प्रवेशाची संधी निश्चित करावी, असे आवाहनही संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.