कार्यकर्त्याला पैशासाठी फिरवू नका**– विनायक सावळे*

*कार्यकर्त्याला पैशासाठी फिरवू नका**– विनायक सावळे*

सामाजिक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता हा अनेकदा सामान्य व्यावहारिक जगाच्या दृष्टीने थोडासा “वेडा” असतो. काही लोक त्याला अक्षरशः “रिकामा माणूस” म्हणतात. कारण सध्याच्या जगात वेळ प्रत्येकजण स्वतःच्या लाभासाठी वापरतो.पण कार्यकर्ता प्रत्यक्षात एका ठाम ध्येयासाठी काम करत असतो.बहुतेक वेळा त्याचे संघर्ष घरातूनच सुरू होतात. कारण तो नोकरी किंवा व्यवसाय सांभाळत असतो आणि *त्याचवेळी कुटुंबाला द्यावा लागणारा वेळ समाजकार्यासाठी देत असतो.* त्यामुळे कुटुंबीयांची नाराजी असणे, मुलांचा राग असणे हेही त्याच्या आयुष्याचा भाग असतो. तरीही हे सगळं सांभाळत तो चळवळीसाठी वेळ काढतो.कार्यकर्त्याच्या आयुष्यात वेळ हा सर्वात मौल्यवान संसाधन असतो.त्याचा वेळेचा प्राधान्यक्रम साधारणपणे असा असतो –संघटनेतील सहकाऱ्यांशी संवाद, चर्चा, बैठका, प्रशिक्षण,समाजाशी संपर्क आणि संवाद,कार्यक्रम, भाषणे, मोहिमा,संघटनेच्या पुढील कामाचे चिंतन आणि नियोजन,स्वतःच्या विकासासाठी वाचन आणि लिखाण,आणि यासोबतच सहकार्यकर्त्यांच्या अडचणींमध्ये मदत.थोडक्यात सांगायचे तर त्याला प्रत्येक क्षण काटकसरीने वापरावा लागतो. कारण वेळच त्याच्याकडे सर्वात कमी असतो.याच ठिकाणी एक वेदनादायक अनुभव अनेक कार्यकर्त्यांना वारंवार येतो.कोणी एखाद्या सामाजिक कामासाठी मदतीचे आश्वासन देतात. पण प्रत्यक्ष पैसे देण्याची वेळ येते तेव्हा *कार्यकर्त्याला वारंवार भेटावे लागते, फोन करावे लागतात, मेसेज करावे लागतात, पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते. अनेकदा त्यासाठी चकरा माराव्या लागतात.*हे कार्यकर्त्याच्या मनाला फार त्रासदायक असते.कारण पैसा उभा करणे हे संघटनेसाठी आवश्यक असतेच. बहुतेक सामाजिक संघटना तुटपुंज्या साधनांवर चालत असतात. त्यामुळे देणगीदारांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असतो. पण जर आश्वासन दिल्यानंतरही कार्यकर्त्याला पैशांसाठी वारंवार फिरावे लागत असेल, तर त्याचा वेळ आणि उर्जा दोन्ही खूप खर्ची जातात. पण कार्यकर्त्याकडे पर्याय नसतो त्याला ते करावेच लागते.आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी –कार्यकर्ता स्वतःसाठी पैसा मागत नसतो.तो एखाद्या मोठ्या सामाजिक उद्दिष्टासाठी मदत मागत असतो.त्यामुळे त्या पैशामागे केवळ व्यवहार नसतो, तर एक विश्वासही असतो.म्हणूनच ज्यांना सामाजिक कार्यासाठी मदत करायची आहे त्यांनी एक छोटी गोष्ट लक्षात ठेवावी –*कार्यकर्त्याला पैशांसाठी फिरवू नका.* आपण मदत करण्याचे ठरवले असेल तर शक्य तितक्या सुलभपणे आणि वेळेत ती मदत द्या. *कारण कार्यकर्त्याचा वेळ हा पैशांपेक्षा खूप मौल्यवान असतो. त्याने समाजासाठी दिलेला वेळ हा प्रत्यक्षात आपल्या सर्वांच्या वाट्याचे योगदान असते.*समाजात जे थोडेफार चांगले काम घडते, लोकांना आधार मिळतो, अंधश्रद्धा कमी होते, अन्यायाविरुद्ध आवाज उठतो — त्या सगळ्यामध्ये अशा कार्यकर्त्यांच्या श्रमांचा मोठा वाटा असतो.पण त्याच्या वाट्याला अनेकदा अपेक्षाभंग, निराशा, अपमान, वादविवाद आणि अपयश येत असतात. हे सगळं सहन करत तो पुन्हा पुन्हा उभा राहतो आणि काम करत राहतो.म्हणूनच किमान एक गोष्ट आपण करू शकतो —त्याच्या वेळेचा सन्मान करूया.ज्यांनी सामाजिक कामासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे त्यांनी कृपया ती मदत देताना कार्यकर्त्याला वारंवार फिरावे लागू नये याची काळजी घ्या. कारण कार्यकर्त्याचा वेळ वाचला तर तो वेळ समाजाच्या कामाला लागेल.आणि शेवटी हेच म्हणावेसे वाटते —*पैसा महत्त्वाचा असतो, पण कार्यकर्त्याचा वेळ त्याहूनही अधिक मौल्यवान असतो.* विनायक सावळे,9403259226.vinayak.savale123@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!