*प्रकाशा नगरीत महाशिवरात्रीनिमित्त ‘नगर भ्रमण’ सोहळा संपन्न; तापी सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम* प्रकाशा (प्रतिनिधी: पंकज गुरव)दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा(ता.शहादा) नगरीत महाशिवरात्रीनिमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही तापी सेवा समितीच्या वतीने भव्य ‘नगर भ्रमण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमाने संपूर्ण प्रकाशा नगरी शिवमय झाली होती. सकाळी 9 वाजेला तापी सेवा समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्री गौतमेश्वर महादेवाची ब्राह्मणवृंद यांच्या कडून विधिवत पूजा करून पालखी आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली..मुख्य मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने मार्गस्थ झाली. विशेष आकर्षण: मिरवणुकीत सहभागी झालेले आकर्षक देखावे पारंपरिक वाद्यवृंद, ढोल-ताशांचा गजर आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. डमरू व झांज पथक, आदिवासी नृत्य पथक, मारवाडी नृत्य पथक, श्रीराम भक्त हनुमंत पथक, सुपरस्टार बँड पथक, अश्व नृत्य पथक यांनी नगरभ्रमणाची शोभा वाढवली. तसेच ठिकठिकाणी ग्रामस्थांनी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले. तसेच भक्तांसाठी नगर भ्रमणादरम्यान ठिकठिकाणी फराळ आणि थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात दुपारी शोभायात्रा येऊन पोचल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रत्येक पथका-कडून श्री गौतमराजांना मानवंदना देण्यात आली. तसेच सायंकाळी 7 वाजेला श्री गौतमेश्वर महादेवाची शयन आरती करण्यात आली, या वेळी नृत्यांजली फाउंडेशनच्या वतीने भरतनाट्यम नृत्य सादर करून मानवंदना देण्यात आली. तापी सेवा समितीचा अनोखा संदेश श्री क्षेत्र प्रकाशाचे नाव लौकिक व्हावे तसेच अध्यात्मिक संस्कृतीचे जतन व्हावे देव देश धर्म परंपरा जपली जावी तसेच “नदी स्वच्छता, पर्यावरण रक्षण” व आपल्या या महादेव नगरीचे नाव देशभर व्हावे असे अनेक उद्दिष्टे ठेवून सर्वांना एकत्र आणणे हाच मुख्य उद्देश आहे.. मंदिर विश्वस्त व गढी परिवारा-कडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच मंदिराचे गुरव पुजारी यांच्याकडून मंदिर गाभाऱ्याची व सभा मंडपाची स्वच्छता ठेवत दर्शनाची सोय करून देण्यात आली. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने या सोहळ्याचा लाभ घेतला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी सेवा समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले.
प्रकाशा नगरीत महाशिवरात्रीनिमित्त ‘नगर भ्रमण’ सोहळा संपन्न; तापी सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम
