शहादा शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव; संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.(प्रशासनाच्या कचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी)शहादा,दि.०९ (प्रतिनिधी) शहादा शहरात सध्या डासांच्या प्रादुर्भावाने रौद्र रूप धारण केले असून अनियोजित शहरीकरण आणि सांडपाण्याच्या तुंबलेल्या व्यवस्थेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ मोरे यांच्यासह शहरातील जागरूक नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार केवळ धूर फवारणी किंवा औषध फवारणी करून ही समस्या सुटणारी नाही. जोपर्यंत डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट केली जात नाहीत, तोपर्यंत डासांचा प्रादुर्भाव कमी होणार नाही. शहरातील अनेक भागांत कचरा नियमित उचलला जात नसल्याने रस्त्याकडेला आणि मोकळ्या भूखंडांवर प्लास्टिक, टायर आणि नारळाच्या करवंद्यांमध्ये पाणी साचून डासांची पैदास होत आहे.शहरातील मोकळ्या भूखंडांवर वाढलेली काटेरी झुडपे आणि गवत यामुळे डासांना सुरक्षित आश्रय मिळत आहे. रात्रीच्या वेळी या झुडपांमधून मोठ्या प्रमाणात डास आसपासच्या वस्त्यांमध्ये शिरत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. प्रशासनाने संबंधित प्लॉटधारकांना नोटिसा देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दाट लोकवस्तीच्या भागात शोषखड्ड्यांची संख्या जास्त असल्याने आणि जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता मर्यादित असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे भूजल प्रदूषणाचा आणि साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात हे शोषखड्डे ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी घराभोवती साचत असल्याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.नागरिकांनी सुचवलेल्या प्रमुख मागण्यामध्ये, प्रत्येक प्रभागात नियमित कचरा संकलन करावे.मोकळ्या प्लॉटवरील झुडपे काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवावी.कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. ‘माझा प्लॉट, माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबवून जनजागृती करावी.शहरासाठी दीर्घकालीन ड्रेनेज आराखडा जाहीर करावा आदि बाबींचा समावेश आहे.या निवेदनाची प्रत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे. प्रशासनाने यावर काय कार्यवाही केली याची लेखी माहिती देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ मोरे यांच्यासह स्वप्निल पाटील, खुशाल शिंदे, प्रकाश चित्ते, व इतर नागरिकांनी केली आहे.
शहादा शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव; संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
