02 शहादा विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत नागरिकांना आवाहन

02 शहादा विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत नागरिकांना आवाहन

02 शहादा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, शहादा तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, शहादा व तळोदा यांच्या वतीने कळविण्यात येते की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 02 शहादा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.सदर कार्यक्रमाचा पहिला टप्पा दिनांक 20 जूनपासून सुरू झाला असून दुसरा टप्पा दिनांक 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांक 5 ऑगस्ट 3 ऑक्टोबर या कालावधीत आवश्यक त्या प्रकरणांमध्ये संबंधितांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात येईल व दिनांक 7 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्राप्त दावे व हरकतींवर निर्णय घेण्यात येईल.02 शहादा विधानसभा मतदारसंघात एकूण 366 मतदान केंद्रे (मतदार यादी भाग) असून त्यापैकी शहादा तालुक्यात 227 आणि तळोदा तालुक्यात 139 मतदान केंद्रांचा समावेश आहे.सदर विशेष पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी नियुक्त बूथ लेव्हल अधिकारी (BLO) प्रत्येक घरास किमान तीन वेळा भेट देणार आहेत. नागरिकांनी BLO यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे.मतदार यादी अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व नागरिकांनी या सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, शहादा तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, शहादा व तळोदा यांनी केले आहे.