ग्राम महसूल अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी; जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

ग्राम महसूल अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी; जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार…

जिल्हा प्रतिनिधी – नरेश शिंदे

नंदुरबार | प्रतिनिधीशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून ग्राम महसूल अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संबंधित संतोष वाल्हे या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मौजे मलोणी, ता. शहादा येथील ग्राम महसूल अधिकारी कल्पेश भालचंद्र शेवाळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार सादर केली आहे.तक्रारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संबंधित व्यक्तीकडून वारंवार कार्यालयात येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला जात असून मानसिक त्रास, दमदाटी तसेच दबाव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.तसेच, आपण अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिकारी असल्याचा उल्लेख करून जातिवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वर्तन करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शासकीय कर्तव्य बजावण्यात अडथळे निर्माण होत असून स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे शेवाळे यांनी म्हटले आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.